Nashik News : नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर येथे महादेवाच्या दर्शनासाठी काळाबाजार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरातील जबाबदार पदावरील व्यक्तीलाच अटक झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी एका भाविकाकडून व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली तब्बल ३ हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच कडलग यांच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या रॅकेटमध्ये कडलग यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कडलग यांना अटक केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, मंदिर संस्थानच्या विश्वस्ताकडूनच अशा प्रकारे दर्शनाचा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही होत होत्या. मात्र, आता थेट विश्वस्तावर कारवाई झाल्याने मंदिर प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस आले आहेत.


