Nagpur Crime: नागपूर आणि अमरावती जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी हृदयविकाराचा (हार्ट अटॅक) बनाव रचून ज्या १९ वर्षीय नवविवाहितेचा अंत्यसंस्कार केला होता, तिचा प्रत्यक्षात गळा आवळून खून झाल्याचे उघड झाले आहे. ‘फाझिला जबीन शेख’ असे या मृत तरुणीचे नाव आहे. माहेरच्यांच्या संशयानंतर पोलिसांनी थेट कबरीतून मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) केले, ज्याच्या अहवालाने पोलीसही चक्रावून गेले आहेत. या प्रकरणी हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह दिरला बेड्या ठोकल्या आहेत.
लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच छळ
अमरावतीच्या फाझिला हिचा विवाह याच वर्षी जानेवारी महिन्यात नागपूरमधील बोरियापुरा येथे राहणाऱ्या जुबेर शेख याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले, मात्र त्यानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी फाझिलाचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला, असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.
“मला वाचवा…” आईला आलेला तो शेवटचा फोन
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक वळण १४ मे रोजी आले. फाझिलाने अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आपल्या आईला फोन केला. ती रडत रडत म्हणाली, “मला वाचवा… माझ्यासोबत इथे काहीही घडू शकतं…” हा संवाद झाल्यानंतर काही वेळातच तिचा फोन बंद झाला. या फोननंतर काही वेळातच सासरच्यांनी फाझिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा केला. नागपुरात पोहोचलेल्या फाझिलाच्या आई-वडिलांना सुरुवातीला मृतदेह दाखवण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी अमरावतीला आणण्यात आला.
अंत्यसंस्कारावेळी संशय बळावला; अन् कबर खोदली!
अमरावतीत अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला धार्मिक प्रथेनुसार स्नान घालत असताना फाझिलाच्या गळ्यावर काही संशयास्पद जखमांचे निशाण नातेवाइकांना दिसले. यामुळे कुटुंबीयांचा संशय अधिक वाढला. फाझिलाचा भाऊ मोहम्मद आवेश अब्दुल हसन याने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत दफन केलेला मृतदेह कबरीतून पुन्हा बाहेर काढला आणि डॉक्टरांच्या पथकाकडून त्याचे शवविच्छेदन करून घेतले. प्राथमिक रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू हृदयविकाराने नाही, तर गळा दाबल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले.
पती आणि दिर गजाआड
पोस्टमार्टेम अहवाल समोर आल्यानंतर नागपूरच्या तहसील पोलिसांनी तात्काळ पावले उचलत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पती जुबेर शेख आणि दिर मोहम्मद इरफान या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. सासरे जलील शेख हे देखील या गुन्ह्यात आरोपी आहेत, मात्र त्यांच्या वृद्धत्वामुळे पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केलेली नाही. या घटनेमुळे नागपूर आणि अमरावती परिसरात हुंडापिसाट सासरच्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.


