MLA Sanjay Gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वादातून सुरू झालेल्या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना कथित धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
वादग्रस्त ठरलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिले असून, या पुस्तकाच्या शीर्षकावरून गेल्या महिन्यात मोठा वाद निर्माण झाला होता. आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
या प्रकरणी प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गायकवाड यांच्या चौकशीची मागणी करत त्यांनी कोल्हापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने पोलीस चौकशीस मंजुरी दिली असून, त्यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, संजय गायकवाड यांनी या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप केला होता. पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असून, औरंगजेबाला आदरार्थी संबोधन वापरल्याचा दावा त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सार्वजनिक वाचन करून पुरोगामी कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला होता.
प्रकाशक प्रशांत आंबी यांनी अजूनही धमकीचे फोन येत असल्याचा दावा केला आहे. गायकवाड समर्थकांकडून शंभरहून अधिक धमकीचे कॉल आल्याचे सांगत त्यांनी पोलिसांकडे नव्याने तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


