पुणे : पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता कोर्टाच्या रिंगणात उतरले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने समन्स बजावले असून, ७ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हे समन्स भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीय सामीर पाटील यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या ५० कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याच्या प्रकरणात बजावण्यात आले आहे.
कोथरुडमधील गुंड निलेश घायवळ गँग प्रकरणातून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची ही लढाई आता कायदेशीर वळणावर पोहोचली असून, महायुतीतील अंतर्गत कलहाला नवे रूप मिळाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
१७ सप्टेंबर २०२५ रोजी घायवळ गँगने एका रस्त्यावरील भांडणातून एका व्यक्तीवर गोळ्या आणि दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्रांचा हल्ला केला. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत घायवळ आणि त्याच्या आठ साथींवर गुन्हा दाखल केला. निलेश घायवळ हा गुंड विदेशात पसार झाला असून, त्याने २०१९ मध्ये तत्काळ पासपोर्ट मिळवला होता, ज्यात पोलिस नोंदींना धक्का लावणारी बाब समोर आली.
पुणे पोलिसांनी युकेच्या हाय कमिशनला पत्र देऊन त्याला अटक करण्याची विनंती केली असून, त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. पोलिसांनी आता इंटरपोलमार्फत ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी करण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. या प्रकरणात धंगेकर यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल केला.
त्यांनी म्हटले की, पाटील यांचे निकटवर्तीय सामीर पाटील हे घायवळ गँगचे ‘ऑपरेशनल लिंक’ असून, त्यांच्या पाठबळामुळे कोथरुडमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट सुरू आहे. धंगेकर यांनी सामीर पाटील आणि घायवळ यांचा फोटो पुढे करत आरोपांचा पाऊस पाडला, ज्यात गुन्हे, दहशत, बेकायदेशीर व्यवसाय आणि राजकीय जोडण्या यांचा उल्लेख होता. त्यांनी पाटील यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घायवळला पासपोर्ट मिळवण्यात मदत केल्याचा आरोपही केला.


