NEET Paper Leak Mastermind : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या NEET UG पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार मनीषा गुरुनाथ मांधरे हिला दिल्लीतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, आरोपी मनीषा ही पुण्यातील एका नामवंत संस्थेत वनस्पतीशास्त्र (Botany) विषयाची वरिष्ठ शिक्षिका असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) तिला परीक्षेसाठी ‘तज्ज्ञ’ म्हणून निवडले होते.
घरीच भरवला ‘पेपरफुटी’चा वर्ग
तपासातून समोर आलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. NTA कडून मिळालेल्या विशेष प्रवेशाचा (Access) गैरवापर करून मनीषाने प्रश्नपत्रिकांची गोपनीयता पायदळी तुडवली. एप्रिल २०२६ मध्ये पुण्यात काही विद्यार्थ्यांची निवड करून तिने आपल्या निवासस्थानीच विशेष मार्गदर्शन वर्ग घेतले. या वर्गात तिने विद्यार्थ्यांना केवळ शिकवले नाही, तर प्रत्यक्ष परीक्षेत येणारे प्रश्न पाठ्यपुस्तकात ‘मार्क’ करून दिले. ३ मे रोजी झालेली परीक्षा आणि मनीषाने दिलेले प्रश्न यात कमालीचे साम्य आढळल्याने हा प्रकार उघड झाला.
सीबीआयचा देशभरात धडाका; ९ आरोपी जेरबंद
गेल्या २४ तासांत सीबीआयच्या पथकांनी दिल्लीसह पुणे, नाशिक, अहिल्यानगर (नगर), जयपूर आणि गुरुग्राममध्ये व्यापक छापेमारी केली. या कारवाईत आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून अटक केलेल्या आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला हलवण्यात आले आहे. छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे, लॅपटॉप आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
यंत्रणेतील ‘तज्ज्ञ’च निघाली रॅकेटची सूत्रधार
ज्यांच्यावर परीक्षेची पारदर्शकता टिकवण्याची जबाबदारी होती, त्याच व्यक्ती घोटाळ्यात सहभागी असल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनीषा मांधरे हिने या कामासाठी किती कोटींची उलाढाल केली आणि तिच्यासोबत आणखी कोणत्या बड्या नेत्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा हात आहे, याचा तपास आता सीबीआय करत आहे. जप्त केलेल्या मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


