Acid Attack: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घराकडे जाणाऱ्या एका इयत्ता सहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला. या भीषण घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नेमका प्रकार काय?
वडगाव पान येथील शाळेत शिकणारी ही चिमुकली नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर घरी जात होती. वाटेत दबा धरून बसलेल्या एका अज्ञात तरुणाने अचानक तिच्या समोर येऊन तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. मुलीने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक धावून आले, मात्र तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला. पीडित मुलीला तातडीने उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांतील दुसरी घटना
संगमनेर तालुक्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच रणखांब गावात लग्नाला नकार दिला म्हणून एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता सहावीतील मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.


