ZP Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली असून, निकालाचे पहिले कल स्पष्ट होऊ लागले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने, संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष या निकालांकडे लागलं आहे.
मतमोजणी सुरू होताच राज्यातील पहिला कल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने पहिल्याच तासात विजय मिळवत खाते उघडलं आहे.
माढ्यात राष्ट्रवादीचा विजय
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी दळवे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. भोसरे गटात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, मात्र अखेर अजित पवार गटाच्या उमेदवाराने सहज विजय मिळवला.
सोलापूर जिल्ह्यातील इतर स्थिती
सोलापूर जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
महूद गटातून शिवसेनेचे दादासो लवटे विजयी
महूद गणातून शिवसेनेचे बाळासाहेब मच्छिंद्र बंडगर विजयी
महूद गणातीलच सोनाली पाटील (शिवसेना) विजयी
करमाळा जिल्हा परिषद पांडे गटातून भाजप नेत्या रश्मी बागल पिछाडीवर
शरद पवार गटाच्या राणी संतोष वारे आघाडीवर
करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख सुमारे 700 मतांनी आघाडीवर
दरम्यान, मतमोजणी अद्याप सुरू असून पुढील काही तासांत राज्यातील इतर जिल्ह्यांचेही कल स्पष्ट होणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ही आघाडी कायम ठेवता येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


