Beed Crime: विवाहबंधनात अडकल्यानंतर अवघ्या १२ दिवसांच्या आत एका तरुण तलाठ्याने गळफास लावून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईजवळील मोरेवाडी भागात घडली आहे. गणेश दत्तू कोळी असे या मृत तरुणाचे नाव असून, तो चंद्रपूर येथे महसूल विभागात कार्यरत होता. या खळबळजनक प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून, मृत गणेशच्या आईने केलेल्या तक्रारीवरून त्याच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील प्रेमसंबंध आणि तिच्याकडून मिळालेल्या मानसिक त्रासामुळेच गणेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुलदैवताच्या दर्शनावेळीच संशयाची ठिणगी
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, १३ मे रोजी गणेशचा विवाह बीड येथील एका तरुणीशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच जेव्हा हे नवदाम्पत्य कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले, तेव्हापासूनच पत्नीचे वर्तन संशयास्पद वाटू लागले होते. ती लपून-छपून कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचा संशय पतीला आला. घरात सत्यनारायणाची पूजा पार पडल्यानंतर पत्नीचे वागणे पूर्णपणे बदलले. ‘हे लग्न माझ्या मर्जीविरुद्ध झाले आहे,’ असे म्हणत तिने गणेशसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून आली.
डायरीतील गुपित आणि शेवटचा फोन
२४ मे रोजी गणेश आपल्या पत्नीची समजूत काढण्यासाठी अंबाजोगाई येथील मोरेवाडी भागात आला होता. मात्र, २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत एक धक्कादायक माहिती दिली. “पत्नीचे दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत आणि तिने स्वतः हे सर्व एका डायरीत लिहून ठेवले आहे,” असे गणेशने बहिणीला सांगितले. ही डायरी गणेशच्या हाती लागल्याने दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. या फोन कॉलनंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची हृदयद्रावक बातमी नातेवाइकांना मिळाली.
पोलीस शिपाई ते तलाठी: यशाचा प्रवास अपूर्ण
गणेश कोळी हा अत्यंत हुशार आणि कष्टाळू तरुण होता. २०२१ मध्ये तो राज्य राखीव पोलीस बलात (SRPF) पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न असल्याने त्याने कर्तव्यावर असतानाच तलाठी परीक्षेचा कसून अभ्यास केला आणि २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली. तर दुसरीकडे, त्याची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या फॉरेन्सिक (फॉरेन्सिक लॅब) विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करते.
पोलीस तपास सुरू
घटनेच्या दिवशी पत्नी कर्तव्यावर गेलेली असताना, गणेशने खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. नवविवाहाचा संसार सुखाचा सुरू होण्यापूर्वीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मोरेवाडी आणि बीड परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. अंबाजोगाई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.


