Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत मुसळधार आणि वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यातील एकूण २२ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, उर्वरित २० जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
देशभरात मान्सूनला पोषक परिस्थिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून पुढील काही दिवसांत देशाच्या आणखी काही भागांमध्ये सक्रिय होणार आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांतही मान्सूनच्या प्रगतीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम
२८ जून ते ४ जुलै या कालावधीत कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज असून, मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सांगोल्यात दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सांगोला तालुक्यात अखेर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.
नागपुरात वीज कोसळून बैलजोडीचा मृत्यू
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील सेलोटी गावात वीज कोसळून एका शेतकऱ्याची बैलजोडी दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर आलेल्या या संकटानंतरही शेतकरी तानबा मरघडे यांनी एका बैलासह स्वतःच्या खांद्यावर आऊत घेऊन चार एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली. आर्थिक अडचणीमुळे नवीन बैलजोडी खरेदी करणे शक्य नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
भिवंडीत चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे काही भागांत खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तसेच धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पाणीटंचाईची समस्या कायम असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


