Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या बैठका आणि कार्यक्रमांपासून त्यांनी अंतर ठेवल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना अधिक जोर मिळाला असून, या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार निंबाळकर यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा देण्यात आल्यानंतर त्यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानाबाहेर तसेच धाराशिव शहरातील संपर्क कार्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, खासदार निंबाळकर हे ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यांनी अलीकडे पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीला तसेच वर्धापन दिन मेळाव्याला अनुपस्थिती लावल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
या घडामोडींमध्ये तुळजापूर शहरात त्यांचे स्वागत करणारे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. “वाघ चालला वाघाच्या कळपात” असा मजकूर असलेल्या या बॅनरमुळे निंबाळकरांच्या संभाव्य प्रवेशाबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत त्यांच्या प्रवेशाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. दरम्यान, त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे ते नेमकी कोणती भूमिका मांडतात, पक्षांतराच्या चर्चांवर काय भाष्य करतात आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत कोणती घोषणा करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


