Farmer Loan Waiver : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत पुन्हा एकदा विलंब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पादरम्यान जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’चा लाभ ३० जूनपर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ही मुदत उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना ५ जुलैपासून कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची नवी मुदत जाहीर केली आहे.
विधानसभेत कृषी समृद्धी योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदींना विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला काहीसा विलंब होत असून, शेतकऱ्यांना ५ जुलैपासून लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी’ राज्याच्या अर्थसंकल्पात २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आणखी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
५६ लाख शेतकऱ्यांना लाभाची अपेक्षा
सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार, या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या अटी आणि निकषांबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनंतर त्यामध्ये काही बदल करण्याबाबत सरकारची उपसमिती सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता असल्याचेही कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.
सरकारवर राजू शेट्टींची टीका
दरम्यान, कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील विलंबावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “कर्जमाफीबाबत सरकारकडून केवळ तारखांवर तारीख दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार ‘तारीख पे तारीख’चे नाटक करत असून, या चालढकलीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे,” असा आरोप त्यांनी केला.


