Petrol-Diesel : देशातील इंधन पुरवठा परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल खरेदीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक वापरासाठी इंधन खरेदी करणाऱ्यांवर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध १ जुलैपासून हटविण्यात येणार असून, त्यामुळे मोठ्या व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावपूर्ण परिस्थिती आणि इंधन पुरवठ्यावरील दबाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या होत्या. या अंतर्गत व्यावसायिक वापरासाठी पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर काही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, आता इंधन पुरवठा हळूहळू सुरळीत होत असल्याने हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे व्यावसायिक ग्राहकांना पेट्रोल पंपांवरून आवश्यकतेनुसार कोणत्याही अतिरिक्त मर्यादेशिवाय पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येणार आहे. यामुळे उद्योग, वाहतूक आणि अन्य व्यावसायिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चांबाबत विविध संकेत समोर येत असताना, जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर भारतातील इंधन धोरणाचेही लक्ष आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून आले असले, तरी देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. देशात २५ मेपासून इंधन दर स्थिर असून, पुढील काळात जागतिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.


