Tukaram Mundhe : राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक मोहीम सुरू केली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार मुंबईतील अनेक नामांकित आस्थापनांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि क्लबच्या परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मुंबईतील विविध भागांत तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या नामांकित रेस्टॉरंटची २७ जून रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगसह अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला.
याशिवाय, बोरीवली येथील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरातील काही हॉटेल्स आणि खाद्य व्यावसायिक आस्थापनांवरही एफडीएने धडक कारवाई केली आहे.
बनावट FDA अधिकाऱ्यांची टोळी सक्रिय?
दरम्यान, एफडीएच्या कारवाईची धास्ती वाढत असतानाच मुंबईत बनावट FDA अधिकारी बनून हॉटेल मालकांना धमकावण्याचा प्रकारही समोर आला आहे. बोरिवली पश्चिम येथील एका हॉटेलवर ‘FDA अधिकारी’ असल्याचे भासवत काही जणांनी धाड टाकली आणि अन्न नमुन्यांच्या तपासणीच्या नावाखाली कारवाईची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हॉटेल मालकाला संशय आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली. तपासात संबंधितांनी ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे बनावट ओळखपत्र वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देण्याचे निर्देश
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांसमोर विनाकारण बाटलीबंद पाणी ठेवण्याऐवजी मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्यासंदर्भातील सूचना फलकही लावावेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ग्राहकाने विशेष मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
२५ मे रोजी स्वीकारला होता पदभार
अन्न व औषध प्रशासन विभागात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती. सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार त्यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारला असून, त्यानंतर राज्यभरात अन्न सुरक्षा आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.


