Maharashtra Politics : रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणात मोठी राजकीय घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. युवासेनेचे आक्रमक नेते उमेश खताते यांनी पक्षाला रामराम ठोकत शेकडो कार्यकर्त्यांसह गटबदलाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेर्डी परिसरात प्रभाव असलेले उमेश खताते हे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते ‘धनुष्यबाण’ हाती घेणार असल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
उमेश खताते हे केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारणातही सक्रिय असून त्यांनी स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. विशेषतः खेर्डी परिसरात पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
या घडामोडीमुळे रत्नागिरीमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.


