Nashik TCS Case: नाशिक येथील नामांकित टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणातील सर्व ९ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात सादर केले असून, त्यातून २०१२ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत पीडितेवर झालेल्या अत्याचाराचा थरारक घटनाक्रम उघड झाला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित हिंदू तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिचे मूळ नाव बदलण्यात आले होते आणि तिला नवीन मुस्लिम नाव देण्यात आले होते.
निदा खानच्या घरी नमाजचे धडे; मोबाईलमध्ये ‘ते’ पुरावे
या प्रकरणातील मुख्य महिला आरोपी निदा खान हिने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. निदाने पीडित तरुणीला स्वतःच्या घरी डांबून तिला नमाज पठणाचे सक्तीचे प्रशिक्षण दिले होते. पोलिसांनी जेव्हा पीडितेचा मोबाईल जप्त करून त्याची तांत्रिक तपासणी केली, तेव्हा त्यात इस्लाम धर्माशी संबंधित तब्बल ३७ ऑडिओ क्लिप आणि ४ विशेष इस्लामिक ॲप्स आढळून आले. हे ॲप्स आणि क्लिप्स पीडितेच्या मोबाईलमध्ये सक्तीने डाऊनलोड करण्यात आले होते, ज्याचा वापर पोलिसांकडून न्यायालयात भक्कम पुरावा म्हणून केला जाणार आहे.
झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून ब्रेनवॉश आणि मानसिक खच्चीकरण
गुन्हेगारांनी पीडितेचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी आणि तिची विचारसरणी बदलण्यासाठी कट्टरपंथी विचारसरणीचा वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ दाखवल्याचा थेट उल्लेख पोलिसांनी चार्जशीटमध्ये केला आहे. “तू नमाज पडली नाहीस तर तुझे कुटुंब नरकात जाईल,” अशी भीती दाखवून तिला मानसिकदृष्ट्या हतबल केले गेले. तिला रोजा ठेवण्यासाठी आणि इच्छेविरोधात बुरखा व हिजाब परिधान करण्यासाठी भाग पाडले जात होते. तसेच, हिंदू देवदेवतांबद्दल सातत्याने आक्षेपार्ह विधाने करून तिच्या धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या.
दानिश शेख, तौफिक अन् साथीदारांचा क्रूर कट
या संपूर्ण कटाची सुरुवात २०२२ मध्ये झाली, जेव्हा आरोपी दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान यांनी पीडितेला टीसीएस कंपनीत नोकरी मिळवून दिली. नोकरी लागल्यानंतर मुख्य आरोपी दानिशने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केले, तसेच तिच्या जातीवरून तिचा मानसिक छळ करत तिच्याकडून मोठी रोकड आणि महागड्या वस्तू उकळल्या. दुसरीकडे, दुसरा आरोपी तौफिक अत्तार याने थेट ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये पीडितेचा विनयभंग केल्याचे चार्जशीटमध्ये नमूद आहे. या प्रकरणात निदा खानला अटक होऊ नये म्हणून आश्रय देणाऱ्या मतीन पटेल या आरोपीवरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, नाशिक पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


