FDA Raid: अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची धुरा स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळ माफिया आणि गुटखा तस्करांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर विभागातील सात जिल्ह्यांमध्ये एफडीएच्या पथकांनी एकाच वेळी मोठी मोहीम राबवत अन्नपदार्थांमधील भेसळ आणि प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापारावर मोठा घाव घातला. १ जून ते ९ जून २०२६ या अवघ्या नऊ दिवसांच्या कालावधीत २७ ठिकाणी धाडी टाकून तब्बल २ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि संशयित खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सात जिल्ह्यांतील कारवाईमुळे भेसळ माफियांमध्ये खळबळ
एफडीएचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकरले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होता. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याने संपूर्ण मराठवाड्यातील भेसळ माफिया आणि गुटखा तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने केवळ संशयित माल जप्त करण्यावर भर न देता संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे.
९ दिवसांतील कारवाईचा धडाकेबाज ताळेबंद
या विशेष मोहिमेदरम्यान विभागातील २७ संशयित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. विविध पोलीस ठाण्यांमध्ये ९ एफआयआर दाखल करण्यात आले असून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणारी ६ दुकाने आणि गोदामे सील करण्यात आली आहेत. तसेच गुटख्याची अवैध वाहतूक करणारी ८ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजित किंमत ७५ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईचा इशारा
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना आणि प्रतिबंधित पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या घटकांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा एफडीएने दिला आहे. “ही मोहीम केवळ सुरुवात असून आगामी काळात संपूर्ण मराठवाड्यात अशा कारवाया अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपात राबवल्या जातील,” असे सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकरले यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात भेसळ आणि गुटखा तस्करीविरोधातील कारवाई आणखी वेगाने होण्याची चिन्हे आहेत.


