पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील काम करण्यास सांगितल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केल्याची घटना बाभुळसर बुद्रुक गावात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
माहितीनुसार, बाभुळसर बुद्रुक येथील दशरथ यशवंत राऊत (वय 84) हे कुटुंबासह वास्तव्यास होते. सोमवारी त्यांनी शेतातील काही कामे करण्यास नातू सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय 26) याला सांगितले. मात्र, यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेली बाचाबाची काही वेळातच गंभीर स्वरूप धारण करू लागली.
वादाच्या भरात संतापलेल्या सोमनाथने जवळील लोखंडी रॉड उचलून आजोबांवर हल्ला केला. त्याने डोक्यावर आणि पाठीवर वारंवार प्रहार केल्याने दशरथ राऊत गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिरूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तपास सुरू केला.
दरम्यान, शिरूर पोलिसांनी काही तासांतच आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात शेतातील कामांवरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.


