Shrirampur News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने कहाणे थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील गोंधवणी परिसरात रात्री सुमारे पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला. चालत्या वाहनावर झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.
हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. राजकीय पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे श्रीरामपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
प्रशांत कहाणे यांच्यावर हल्ला का करण्यात आला, यामागे वैयक्तिक की राजकीय कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकीचाही शोध सुरू आहे.


