Weather Update : राज्यातील उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र पूर्णपणे व्यापला असून अनेक भागांत दमदार पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील 26 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून सध्या रत्नागिरी आणि हरणाईपर्यंत पोहोचला असून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतही त्याने हजेरी लावली आहे. तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांमध्येही मान्सूनची प्रगती झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या उर्वरित भागांतही मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज (9 जून) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनच्या पुढील वाटचालीमुळे कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


