Pune Crime: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. या थरारक प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून दोन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत, तर इतर दोन आरोपी पोलिसांना चकवा देऊन ऊसाच्या दाट शेतात पळून जाण्यात यशस्वी झाले. या गोळीबारामागे व्यावसायिक भागीदारीचा (PartnerShip) वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तीन राऊंड फायर अन् परिसरात पळापळ
प्राथमिक माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी येथील तरुण आणि पाटस परिसरातील तरुणांमध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी थेट गावठी पिस्तूल काढून हवेत तीन राऊंड फायर केले. गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आणि नागरिकांची एकच पळापळ झाली. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना दिली.
ऊसाच्या शेताला पोलिसांचा वेढा
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान दोघांना जाळ्यात पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, पोलिसांची गाडी पाहताच इतर दोन आरोपींनी बाजूलाच असलेल्या ऊसाच्या दाट शेताचा आसरा घेतला. पळून गेलेले आरोपी शेतातच दडून बसल्याचा संशय असल्याने पोलिसांनी संपूर्ण ऊसाच्या शेताला वेढा घातला असून, त्यांचा माग काढण्यासाठी मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
गोळीबाराचे मूळ कारण आले समोर
हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत सुरुवातीला तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता, पार्टनरशिपच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे दौंड तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फरार आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान सध्यातरी पोलिसांसमोर असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


