Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, कागल आणि भुदरगड परिसराला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जाळ्यात ओढून तिची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ तयार करण्यात आले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुरगूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने ओळखपत्र बनवण्यासाठी मुख्य संशयिताला स्वतःचे छायाचित्र पाठवले होते. ओळखपत्र तयार झाल्याचे सांगत त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर विविध कारणे सांगून तिला निर्जन ठिकाणी नेण्यात आले.
तक्रारीनुसार, तिच्या छायाचित्रांचा गैरवापर करून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. या धमकीच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल करत विविध ठिकाणांवरील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच या चित्रीकरणाचा आधार घेत तिला इतर संशयितांच्या संपर्कात राहण्यास भाग पाडण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित संशयितांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पोलिसांकडे करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयितांना अवघ्या एका तासात अटक केली. न्यायालयाने सर्व आरोपींना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


