Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीतील आपल्या पक्षाच्या स्थानाबाबत स्पष्ट भूमिका घेत महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. विधान परिषद निवडणुकीत आरपीआयला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी आगामी महामंडळ वाटपात पक्षाला योग्य वाटा मिळावा, अशी मागणी केली आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमधून रामदास आठवले यांनी भाजप-शिवसेना युतीच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून दिली. कठीण काळात रिपब्लिकन पक्षाने युतीसोबत ठामपणे उभे राहत पाठिंबा दिला होता. आरपीआयच्या सहभागामुळेच युतीचे रूपांतर ‘महायुती’मध्ये झाले, असा दावा त्यांनी केला.
तसेच गरीब, वंचित आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरपीआयने महत्त्वाची भूमिका बजावली असून पक्ष देशभरात विस्तारत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात पक्षाला कोणीही गृहीत धरू नये यासाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महायुतीशी निष्ठा कायम असल्याचे स्पष्ट करताना आठवले म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आरपीआय दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. “आठवले कुठेही जाणार नाहीत आणि दगाही करणार नाहीत, पण याचा अर्थ आम्हाला गृहीत धरावे असा नाही,” असे त्यांनी ठामपणे म्हटले.
विधान परिषद निवडणुकीत आरपीआयला जागा मिळायला हवी होती, अशी भावना व्यक्त करत त्यांनी आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी पक्षाच्या निष्ठेचा आणि मैत्रीचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.


