Amitesh Kumar : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यातील वाद आता अधिकच चिघळला आहे. “पुणे गुन्हेगारांची राजधानी होत आहे” असा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना अमितेश कुमार यांनी तब्बल 9 पानी पत्राद्वारे अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे.
पत्रात त्यांनी 1 जानेवारी ते 27 मे 2026 या कालावधीत पुण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा केला आहे. सोनसाखळी चोरीत 56 टक्के, लुटमारीत 36 टक्के, वाहन चोरीत 28 टक्के आणि खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये 27 टक्के घट झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, NCRB च्या आकडेवारीनुसार देशातील 19 प्रमुख महानगरांमध्ये पुणे 18 व्या क्रमांकावर असून ते सुरक्षित शहर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, मे महिन्यात घडलेल्या काही गंभीर घटनांमुळे गुन्हेगारी वाढल्याचे चित्र निर्माण झाल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. आता या पत्राला सुप्रिया सुळे काय उत्तर देतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.


