Dharashiv MLC Election : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली आहे. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन पवार आणि काही नगरसेवक भाजप पदाधिकाऱ्यांसोबत दिसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीने या मतदारसंघात काँग्रेसचे महेश देशमुख यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात भाजपचे बसवराज पाटील मैदानात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चेला सुरुवात झाली होती.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बंडखोरी रोखण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. त्याचवेळी सचिन पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान ते भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासोबत दिसल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले.
विशेष म्हणजे, सचिन पवार यांच्यासोबत ठाकरे गटातील आणखी चार नगरसेवक उपस्थित होते. अर्ज मागे घेतल्यानंतर या नगरसेवकांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट न घेता भाजप पदाधिकाऱ्यांसोबत छायाचित्रे काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील काही पदाधिकारी आणि नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, सचिन पवार यांच्याकडे पक्षाच्या व्हीपसंबंधी अधिकार असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करणे पक्षासाठी सोपे राहणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.


