MLC Election : अमरावतीतील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अर्ज बाद झाल्यानंतर वाद
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र शपथपत्रातील त्रुटींवर आक्षेप नोंदवण्यात आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. हा निर्णय जाहीर होताच जिल्हाधिकारी कार्यालयात वातावरण तापले.
जिल्हाधिकाऱ्यांशी वाद, गुन्हा दाखल
सुनावणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी विप्लव बाजोरिया यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणि धमकीवजा भाषेचा वापर केल्याची तक्रार निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर बाजोरिया पिता-पुत्रांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
बाजोरियांचे पलटवार
या कारवाईनंतर गोपीकिशन बाजोरिया यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “आम्हाला न्याय मिळाला नाही. निर्णयाची प्रत वेळेत देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी पक्षपातीपणे वागले आणि आमच्या अर्जाची सुनावणी केवळ काही मिनिटांत आटोपली,” असा दावा त्यांनी केला.
भाजपला दिलासा
अमरावतीची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली असताना विप्लव बाजोरिया यांनी बंडखोर उमेदवारी दाखल केल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली होती. मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपची चिंता काही प्रमाणात कमी झाल्याचे मानले जात आहे. आता या प्रकरणाचा पुढील निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.


