Mumbai Crime News: मुंबईतील महत्त्वाचे मध्यवर्ती तुरुंग असणाऱ्या ऑर्थर रोड जेलमध्ये शनिवारी दुपारी कैद्यांमध्ये जोरदार राडा झाला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली, त्यात मध्यस्थी करणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राकेश चव्हाण हे अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैदी अफान सैफीउदीन खान आणि इतर कैदी इम्तियाज इस्तियाक खान यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला. कारागृह अधिकारी राकेश चव्हाण यांनी भांडण मिटविण्याचा प्रयत्न करून दोघांना बाजूला केले असता, अफानने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अफानने राकेश चव्हाण यांचे डोके गेटवर आदळले आणि बेदम मारहाण केली. हा प्रकार लक्षात येताच इतर कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अफानला ताब्यात घेत बॅरेक दोनमध्ये बंद केले. जखमी अधिकारी राकेश चव्हाण यांना रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच एन. एम. जोशी मार्ग पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राकेश चव्हाण यांच्या तक्रारीनंतर अफान खानविरुद्ध गंभीर दुखापतीसह सरकारी कामात अडथळा आणणे तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला लवकरच अटक केली जाणार आहे.


