अहिल्यानगर: आज सकाळी अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा तणाव निर्माण झाला. दुर्गा मातेच्या मिरवणूकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे काही नागरिक नगरच्या कोटला परिसरात जमा झाले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यानंतर स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. तथापी, पोलिसांनी काही लोकांना ताब्यातही घेतले. या लाठीचार्जचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नगर पोलीस दलाचे अधिकाऱ्यांनी घटनाक्रम स्पष्ट करत सांगितले की, सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रस्त्यावर रांगोळी काढली होती. त्यावर एका समाजाने आक्षेप घेतला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. रांगोळी काढलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. यानंतर संबंधित गटाचे काही सदस्य कोटला परिसरात जमा झाले आणि रस्त्यावर आंदोलन केले. पोलीसांनी त्यांना हटण्याची सूचना केली आणि विनंती केली, परंतु ते तिथून उठले नाहीत.
जमावाकडून पोलिसांवर दगडफेक –
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांपैकी काहींनी दगडफेक केली, ज्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जमावातील काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे. तथापी, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


