पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या नवीन दालनाच्या उद्घाटन प्रसंगी पुरुषांना सोन्याचे दागिने घालण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, सोन्याचे दागिने स्त्रियांवर शोभून दिसतात. पुरुषांच्या अंगावर ते आकर्षक दिसत नाहीत. गळ्यात जाडजूड चेन घालणारे पुरुष साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात.
अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या लोकांना देखील कानपिचक्या दिल्या. त्यांनी स्पष्ट केले की, सोन्याचे दागिने हे आई, पत्नी, बहिणी आणि मुलीच्या अंगावरच शोभून दिसतात, पुरुषांनी उगाच त्या भानगडीत पडू नये. सोन्याकडे आपण घरातील स्त्रीधन म्हणून पाहतो. त्यामुळे ते स्त्रियांना दिल्यास जास्त चांगले होईल. तथापी, अजित पवारांनी लोकांच्या सोन्यावरील आवडबाबतही भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, आपल्या भागात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सोन्याची प्रचंड आवड आहे. आधुनिक काळात लोकांची खरेदी क्षमता वाढली आहे. अडचणीच्या वेळेस सोनं बँकेत गहाण ठेवता येतं.
याशिवाय पिंपरी-चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारच्या मदतीच्या योजना स्पष्ट केल्या. त्यांनी सांगितले की, सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा रोष, नाराजी आणि विरोध पाहिला आहे. घरदार उध्वस्त झाल्याने आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ही प्रतिक्रिया साहजिक आहे.
दरम्यान, अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकसानीची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी विविध विभागांची मदत घेण्यात येणार असून, सरकार उद्याच्या बैठकीत याबाबत निर्णय घेईल. सध्या तातडीच्या मदतीत प्रत्येक शेतकऱ्यास 5000 रुपये रोख, अन्नधान्य, कपडे आणि निवारा यासारखी मदत दिली जात आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही यावेळी अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.


