Gas Shortage: इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेले गॅसटंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. सिलिंडरच्या मिळत नसल्याने मुंबईतील अनेक रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकासाठी आता कोळशाच्या चुलींचा वापर केला जात आहे. मात्र, चुलींवर सर्व पदार्थ बनविणे शक्य नाही. त्यामुळे रेस्टॉरंट व्यवसाय निम्म्याहून अधिक घटला आहे.
अनेक हॉटेल्समध्ये व्यावसायिक सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र, केंद्र सरकारने त्याच्या वितरणावर निर्बंध आणले आहेत. परिणामी हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बहुतांश हॉटेलमधील सिलिंडर संपले आहेत. मात्र, हॉटेल बंद करणे शक्य नसल्याने या व्यावसायिकांनी कोळशाच्या चुलींचा वापर सुरू केला आहे.
वांद्रेतील एका नामांकित हॉटेलला दररोज साधारणपणे सहा ते आठ सिलिंडर लागतात. आता एकही सिलिंडर मिळत नसल्याने १६ हजार रुपये खर्चून ‘इंडक्शन’ आणले. मात्र, मेनूतील खाद्यपदार्थांना अधिक ऊर्जेची गरज असल्याने ते ‘इंडक्शन’वर शिजविणे शक्य नाही. त्यामुळे नवीन ‘इंडक्शन’ गोदामात ठेवल्याचे एका हॉटेल मालकाने सांगितले.
कोळशाचा दर ३२ रुपये प्रति किलोवरून ६० रुपयांवर –
कोळशाच्या चुलीवर सर्व पदार्थ तयार करणे शक्य नाही. केवळ २० ते ३० टक्के खाद्यपदार्थ तयार करत आहे. त्यामुळे व्यवसायात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
काही दिवसांपूर्वी ३२ रुपय प्रति किलोला मिळणारा कोळसा आता ६० रुपयांपर्यंत गेला आहे, असे वांद्रे येथील रेस्टॉरंटचे मालक सय्यद मोहसीन यांनी सांगितले. हॉटेलमध्ये २०० कामगार असून, त्यांना नोकरीवरून काढू शकत नाही.
जेवणाचा खर्च आम्हाला करणे भाग आहे. ही परिस्थिती अधिक दिवस राहिल्यास त्रासात वाढ होईल, असे मोहसीन यांनी नमूद केले.
सद्यस्थितीत अनेक व्यावसायिकांवर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे, तर काही हॉटेल्सनी मेनूतील पदार्थ कमी केले आहेत. या व्यवसायावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे आम्हाला अत्यावश्यक सेवेत सामावून घेऊन गॅसपुरवठा करावा, असे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन प्रवक्ते प्रदीप शेट्टी यांनी म्हटले.
‘आता नुकसान सहन करणे अशक्य’
वांद्रे येथील अन्य एका हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी पाइप गॅसचा वापर होतो. सध्या त्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र, या गॅसच्या पुरवठ्यात २० टक्के कपात केल्यानंतर अडचणी वाढणार आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे आधीच तीन वर्ष मागे गेलो आहोत. आता व्यवसाय बंद पडला तर नुकसान सहन करणे शक्य नाही. काही वेळासाठी गॅसपुरवठा बंद केला तरी व्यवसायावर परिणाम होणार आहे.
तसे झाल्यास इलेक्ट्रिक शेगडीवर जेवढे पदार्थ बनविणे शक्य होईल तेवढेच पदार्थ मेनूमध्ये ठेवू, असे या रेस्टॉरंटचे मालक समीर मोरे यांनी सांगितले.


