Ambadas Danve threat call News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
दानवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ११ मार्च ते १४ मार्चदरम्यान त्यांना सलग चार दिवस अज्ञात व्यक्तीकडून फोन आले. फोनवरून “ठोकून टाकू, कापून टाकू” अशा शब्दांत धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ९५९५९५९३०३ या मोबाईल क्रमांकावरून हे फोन आल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दानवे यांनी सांगितले की १५ मार्चच्या पहाटे १.५४, १.५५ आणि २.०० वाजता पुन्हा फोन करून शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्या. या वेळी तीन ते चार जणांनी फोनवरून धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर मध्ये या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. अलीकडेच दानवे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांना धमक्या देण्यात आल्या का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


