Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका खासगी वसतीगृहात धक्कादायक घटना घडली आहे. सूर्योदय निवासी वसतीगृह चालक सुरेश राठोड याने केवळ एक हजार रुपयांच्या थकीत शुल्कावरून नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या अमानुष कृत्यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरला असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
मारफळा तांडा येथील ऊसतोड मजूर बाळू जाधव यांचा मुलगा गेवराई येथील या वसतीगृहात राहून शिक्षण घेत आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी वसतीगृहाचे एकूण ३९ हजार रुपये शुल्क निश्चित झाले होते. पालकांनी ३८ हजार रुपये भरले होते, फक्त एक हजार रुपये थकीत राहिले.
या रकमेवरून चालक सुरेश राठोड याने वारंवार तगादा लावला. शेवटी शुल्क वेळेवर न दिल्याच्या कारणावरून त्याने विद्यार्थ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. पालकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुरेश राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना अशा प्रकारची वागणूक मिळणे हे अक्षम्य असल्याचे मत व्यक्त होत आहे.
विवाहित महिलेवर अत्याचार, चावडीत बांधून ठेवले
बीड जिल्ह्यात आणखी एक मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवण्यात आले.
पीडित महिला पतीसोबत घरी झोपलेली असताना आरोपी वैभव पटेकर याने घरात घुसून तिला जबरदस्तीने बाहेर नेले आणि अत्याचार केला. नंतर तिला चावडीत बांधून ठेवले. सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर महिलेची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी वैभव पटेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही घटनांमुळे बीड जिल्ह्यात महिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


