मुंबई : काँग्रेसने आज सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद वाढली असून, विरोधी पक्षांना मोठा झटका बसला आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करत म्हणाले, “काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार आणि राहुल गांधी यांचे आश्वासक नेतृत्व यावर विश्वास वाढत आहे. काँग्रेसचा विचार हाच देशाचा विचार आहे. आज धर्मांध शक्तींचा मुकाबला फक्त काँग्रेसच करू शकते. आमचा विचार बहुजनांचा, संविधानाचा, साधू-संतांचा आणि विश्वशांतीचा आहे. दुसरीकडे मात्र ‘तोडा-फोडा आणि राज्य करा’ हा संधीसाधू विचार आहे. एका हातात विचार आणि दुसऱ्या हातात कृती घेऊन संघर्ष करा, सर्वसामान्यांना न्याय द्या.”
राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार टीका करत म्हटले, “भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ते धर्मांध विष पसरवून सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. आर्थिक विषमता वाढली असून, सरकार मुठभर श्रीमंतांसाठी काम करत आहे. शेतकरी, शेतमजूर, गरिब आणि वंचितांना दुर्लक्षित केले जात आहे. काँग्रेस जनतेच्या भावनांशी एकरूप आहे. जे सत्तेसाठी गेले, ते आता परत येत आहेत. पुढच्या पिढीसाठी लढूया.”
या कार्यक्रमाला काँग्रेसचे सचिव सचिन सावंत, माजी आमदार अनंत गाडगीळ, राजेश शर्मा, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे, प्रा. प्रकाश सोनावणे आदी नेते उपस्थित होते. हे सामूहिक प्रवेश काँग्रेससाठी मोठे बळकटीकरण ठरले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी अधिक मजबूत झाली आहे.


