LPG e-KYC : घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जाण्याची गरज नसून ही प्रक्रिया घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करता येते. Indane, Bharat Gas किंवा HP Gas या गॅस कंपन्यांच्या अधिकृत मोबाइल ॲपद्वारे तसेच UMANG ॲपच्या मदतीने बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करून e-KYC पूर्ण करता येते. यासाठी Aadhaar FaceRD ॲप वापरून फेस ऑथेंटिकेशन केले जाते.
ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून सबसिडी नियमित मिळत राहण्यासाठी आणि गॅस पुरवठ्यात अडथळे येऊ नयेत म्हणून ती करणे आवश्यक आहे.
LPG e-KYC कशी करावी?
1. तुमच्या गॅस कंपनीचे मोबाइल ॲप किंवा UMANG ॲप डाउनलोड करा.
2. मोबाईल नंबर टाकून ॲपमध्ये लॉगिन करा.
3. e-KYC किंवा “आधार प्रमाणीकरण” पर्याय निवडा.
4. Aadhaar FaceRD ॲपच्या मदतीने चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.
5. पर्यायी पद्धत म्हणून ग्राहक गॅस एजन्सीमध्ये जाऊनही केवायसी फॉर्म भरू शकतात.
e-KYC न केल्यास काय होऊ शकते?
ग्राहकांनी e-KYC पूर्ण केली नाही तर गॅस बुकिंग प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. तसेच सबसिडी थेट खात्यात जमा होण्यात समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण रक्कम भरावी लागू शकते आणि सुमारे 300 ते 400 पर्यंतचा सबसिडीचा फायदा मिळणार नाही. काही प्रकरणांमध्ये गॅस कनेक्शन तात्पुरते ब्लॉक होण्याची शक्यताही आहे.
सायबर फसवणुकीपासून सावध
दरम्यान, गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगार लोकांना फोन किंवा मेसेज करून फसवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांकडे आल्या आहेत. काहीजण स्वतःला Mahanagar Gas Limited चे प्रतिनिधी असल्याचे सांगून लिंक किंवा APK फाइल पाठवतात. अशा लिंक उघडल्यास बँक खात्यातील पैसे चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात LPG चा तुटवडा नाही
दरम्यान, राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यात दररोज सुमारे 9000 मेट्रिक टन एलपीजीची मागणी असून उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती गॅस तसेच इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


