सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील मालवणमध्ये तारकर्ली समुद्र किनार्यावर पुण्यातील पाच पर्यटक अंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. पाचपैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले असता त्यामधील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांना एका पर्यटकाला वाचण्यात यश आले आहे. मृत दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले आहेत. समुद्रात खोल जाऊ नये, असे स्थानिकांनी सांगून देखील हे पर्यटक खोल समुद्रात गेल्याने सदर दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. तर ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी (दि. 22) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्र किनार्यावर अंघोळीसाठी आले होते. यामधील तीनजण अंघोळीसाठी खोल समुद्रात गेले होते. स्थानिकांनी त्यांना खोल समुद्रात जाऊ नका, असे सांगितले. तरी देखील तिघेजण पर्यटक खोल समुद्रात आंघोळीसाठी गेले. त्यानंतर तिघेही पाण्यात बुडत लागले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तीनपैकी एकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. तर इतर दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.


