न्यूझीलंड संघाने पुन्हा एकदा सर्वोत्तम सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करताना श्रीलंकेवरील सुरेख विजयासह यंदाच्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले. न्यूझीलंड संघ २०१४ स्पर्धेपासून या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकलेला नाही. या वेळी ही मजल त्यांच्या दृष्टिक्षेपात आली आहे. अर्थात, यजमान म्हणून श्रीलंकेसाठी ही स्पर्धा दुर्दैवी ठरली. एक सामना बाकी असतानाच त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता या गटातीन इंग्लंड वि. न्यूझीलंड आणि पाकिस्तान वि. श्रीलंका असे सामने बाकी आहेत. इंग्लंडने यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे त्यांच्यावर या सामन्याचे दडपण नसेल. हा सामना गटातील पहिले दोन क्रमांक ठरवण्याचे महत्व राखून आहे. याासमन्यात न्यूझीलंड संघ पराभूत झाला आणि तिकडे पाकिस्तान संघ जिंकला तरी तेवढा फरक पडणार नाही. कारण, न्यूझीलंड संघ निव्वळ धावगतीमध्ये पाकिस्तानपेक्षा कितीतरी पुढे आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी स्पर्धेत खेळण्यापासून सुरु केलेल्या उखाळ्या पाखाळ्यातून समारोप विजयाने करणे इतकेच हातात राहणार आहे.
न्यूझीलंड आणि श्रीलंका दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. श्रीलंका पहिला सामना हरले होते आणि न्यूझीलंडचा सामना पावसाने वाया गेला होता. त्यामुळे आत्मविश्वास मिळविण्यासाठी दोघांनाही विजय आवश्यक होता. घरच्या मैदानावर खेळताना श्रीलंका संघ त्याचा फायदा घेईल असे वाटले होते. मात्र, नाणेफेकीला त्यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली. विजय आवश्यक असलेल्या सामन्यात घरच्या मैदानावर आणि तेही दिवस-रात्र सामन्यात खेळत असताना कुठलाही संघ प्रथम निव्वळ धावगतीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून प्रथम फलंदाजी करणार यात शंका नव्हती. प्रकाशझोतात रात्री पडणारे दवं हे निश्चितच आव्हानाचा पाठलाग करताना कठिण जाणार हे माहित होते. इतके सगळे असूनही श्रीलंका संघाने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात झाली तेव्हा टिम सेफर्ट आणि फिन अॅलन यांनी तो चुकीचा ठरवायला सुरुवात केली. षटकामागे दहाच्या धावगतीने त्यांनी सुरुवात केली. पण, चेंडू फिरकी गोलंदाजांच्या हाती आला तसे चित्र बदलू लागले. न्यूझीलंडची फलंदाजी गडबडली. एकामागून एक त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. बिनबाद ३० वरुन त्यांची अवस्था २ बाद ३४ अशी झाली. रचिन रविंद आणि ग्लेन फिलिप्स यांनी तोच वेग कायम राखला. पण, पटकेबाजीच्या नादात ते देखिल बाद झाले. तोवर डावातील मधली षटके सुरु झाली आणि इथेच श्रीलंका संघाने वर्चस्व मिळविले. न्यूझीलंड संघ ३ बाद ७५ वरुन ६ बाद ८४ असा अडचणीत आला. न्यूझीलंडची मिचेल सॅंटनेर आणि कोल मॅकोंची ही नवी जोडी मैदानावर होती. हातात केवळ सात षटके. यातील तीन षटके दोघांना स्थिरावण्यात गेली. तोवर श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज संपले आणि मग या दोघांनी आपली बॅट अगदी सहज चालवली. त्यांचे सरळ फटके सुद्धा श्रीलंका संघाच्या आव्हानावर आसूडासारखे पडत होते. अखेरच्या पाच षटकांत श्रीलंकेने ७८ धावा कुटल्या. त्यातील ५२ धावा या अखेरच्या तीन षटकांतील होत्या. सामन्याचे चित्र स्पष्ट झाले होते.
श्रीलंका संघ आव्हानाच्या पाठलागासाठी मैदानात उतरला. पथुन निसंका आणि कुशल मेंडिस जोडी मैदानात आली. आव्हानाचा पाठलाग करताना पथुनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केली होती. सहाजिकच त्याच्यावर आशा होत्या. न्यूझीलंडचा नवा चेंडू मॅट हेन्रीच्या हातात होता. पहिलाच चेंडू त्याने सीमवर आणि टप्प्यावर टाकला. बस्स…या एका चेंडूने श्रीलंकेच्या काळजाचा ठोका चुकवला. पहिल्याच चेंडूवर पथुन निसंकाच्या यष्ट्या उध्वस्त झाल्या. दुसऱ्या षटकांत हेन्रीने असलंका याला देखिल बाद केले. इथे न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीची कामगिरी संपली. त्यानंतर सतरा षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली. यात डावखुऱ्या फिरकी गोलंदाज रचिन रविंद्रने श्रीलंकेची मधली फळी कापून काढली. त्याने २७ धावांत ४ गडी बाद केले. कारकिर्दीमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी. फलंदाजीतले अपयश रविंद्र आपल्या फिरकीने खोडून काढतोय. स्पर्धेत त्याने आतापर्यंत १२ गडी बाद केले आहेत. एखाद्या कर्णधाराला आपल्या खेळाडूंकडून यापेक्षा वेगळे काय हवे असते. एक संघ म्हणून न्यूझीलंडचा प्रत्येक खेळाडू खेळतोय. फिरकी गोलंदाजांचे यंदाच्या स्पर्धेतील वर्चस्व वाढतच चाललंय. या सामन्यापर्यंत सर्वाधिक षटके फिरकी गोलंदाजांकडून टाकली गेली आहेत.
असो, भारतासाठी मात्र आजची रात्र वैऱ्याची आहे. एकाही खेळाडूला झोप लागणार नाही. सगळेच चिंतेत आहेत. खेळाडूंवर जेवढे दडपण आहे, तेवढे कदाचित त्यापेक्षा अधिक मैदानाबाहेर त्यांच्या चाहत्यांवर आहे. आतापर्यंत गळ्यापाशी आल्यावर भारताने नेहमीच बाजी मारली आहे. या वेळी मारणार यातही शंका नाही. शेवटी क्रिकेट जग भारताभोवती फिरतंय. भारत नाही, तर मजा नाही अशी चाहत्यांची धारणा आहे. आता विक्रमांचे इमले रचून भारत उपांत्य फेरीचे दिव्य पार करणार अशाच चर्चा आहेत. पण, थोडं थांबा…रात्र वैऱ्याची आहे. भारताच्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सामना आहे. या सामन्याचा निकाल भारताचा मार्ग सोपा आणि कठिण करणारा आहे. सोपा कसा आणि कठिण कसा यासाठी चोविस तास थांबा…प्रतिक्षा करा..!


