खेळ असो वा लढाई अखेरच्या क्षणी काहीही होऊ शकते. क्रिकेटच्या मैदानावर शुक्रवारी झालेल्या सामन्याने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. इंग्लंडच्या विजयी मालिकेमुळे त्यांचे गटातील अव्वल स्थान निश्चित झाले आणि त्यांनी पाकिस्तानच्या उपांत्य पेरी गाठण्याच्या आशांना पुन्हा जिवंत केले. न्यूझीलंडला उपांत्य फेरी गाठण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक होता. मात्र, त्यांना हा विजय साकार करण्यात अपयश आले. या अपयशाने त्यांनी स्वतःहून आपला मार्ग कठिण केला. न्यूझीलंडचे तीनही सामने झाले आहेत. गटात राहिला आहे तो फक्त आज होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना. या गटातही आता या सामन्याला महत्व आले आहे. स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी आपले उपांत्य फेरीतील स्थान कधीच निश्चित केले आहे. त्यामुळे इंग्लंडला या सामन्यातील पराभवाचा फरक पडत नव्हता. पण, साखळीतील अनिश्चित कामगिरीनंतर त्यांनी अव्वल आठ फेरीत कमालीच्या चिवट प्रतिकाराने तीनही सामने जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले.
न्यूझीलंडचा पराभव झाला असला, तरी त्यांची निव्वळ धावगती पाकिस्तानपेक्षा सरस आहे इतकाच त्यांन फायदा आहे. पाकिस्तानची निव्वळ धावगती उणे ०-४६१ अशी आहे. तर न्यूझीलंची अवस्था अधिक १.३९ अशी आहे. यामुळे पाकिस्तानला आता आज श्रीलंकेविरुद्ध नुसता विजय नव्हे, तर मोठा विजय अपेक्षित असेल. त्यांना आव्हानाचा पाठलाग करुन विजय मिळवायचा असेल, तर श्रीलंकेचे आव्हान १३.१ षटकांत पार करावे लागेल. प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना श्रीलंकेवर ६३ धावांनी विजय आवश्यक असेल. दोन्ही संघाची ताकद बघितली तर हे आव्हान तसे कठिण आहे. यात श्रीलंका कसा खेळ करणार हा महत्वाचा भाग ठरणार आहे. सलग दोन पराभवामुळे श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तानची कामगिरी देखिल फारशी चांगली नाही. पण, खेळात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. त्यामुळेच आता श्रीलंका या सामन्याला कसे सामोरे जाते हे पाहणे सर्वात रंगतदार ठरणार आहे.
या सामन्यानंतर जो कोणी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल तो दक्षिण आफ्रिकेशी खेळणार आहे. त्याचवेळी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विजेता संघ इंग्लंडशी वानखेडे मैदानावर दुसऱ्या उपांत्य सामन्यात खेळेल. या दोन्ही संघांना निव्वळ धावगतीची चिंता नाही. दोघांनाही फक्त विजय आवश्यक आहे. भारताची फलंदाजी स्पर्धे त तशी चांगली झालेली नाही. झिम्बाब्बेविरुद्ध त्यांनी भलेही विजय मिळविला असला, तरी त्यांना फार मोठी धावसंख्या उभी करता आली नाही आणि अपेक्षित मोठा विजयही मिळवता आला नाही. त्यामुळेच त्यांची धावगती अजून उणेच आहे. भारताच्या फलंदाजीच्या उणिवा आतापर्यंत समोर आल्या होत्या. पण, झिम्बाब्वेच्या सामन्यात गोलंदाजीच्या मर्यादा देखिल उघड्या पडल्या. झिम्बाब्वेला रोखताना भारतीय गोलंदाज विजय निश्चित समजून काय गोलंदाजी करत होते हे त्यांचे त्यांनाही कळत नव्हते. अर्शदीप, हार्दिक यांनी आपली षटके चांगली टाकली. बुमराला तीनच षटके मिळाली. पण, ज्या स्पर्धेत फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत तेथे भारतीय फिरकी गोलंदाज दादागिरी करु शकले नाहीत. मायदेशात खेळताना भारताच्या फिरकीवर ही वेळ आली हे दुर्दैव म्हणावे लागेल.
या स्पर्धेत जशी फलंदाजी झाली आणि झिम्बाब्वेविरुद्ध जशी गोलंदाजी केली तशी रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध करुन चालणार नाही. दोन्ही आघाड्यांवर भारताला परिपूर्ण नियोजन करावे लागणार आहे. विंडीज संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही. भारत हरला तर त्यांना प्रतिष्ठा गमवावी लागणार आहे. टी २० क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून या संघाकडे बघितले जात होते. स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंपैकी सर्वाधिक टी २० सामने भारतीय खेळाडूंनी खेळले आहेत. तरी देखिल ही अवस्था भारतीय संघावर आली ती केवळ नियोजनाच्या अभावामुळेच. वेस्ट इंडिज संघाला नियोजन वगैरे काही माहित नसते. चांगल्या चेंडूचा आदर करणे म्हणजे काय हे देखिल त्यांना माहित नाही. येणारा प्रत्येक चेंडू मारायाचा हाच त्यांचा चेंडूबद्दलचा आदर असतो. त्यामुळे ते अधिक धोकादायक असतात. भारताला नेमके हे टाळायचे आहे. त्यांना फटकेबाजीची थोडी जरी संधी दिली, तर ते मैदानावर काही करु शकतात. या सामन्याला अजून एक दिवस आहे. सध्या आज पाकिस्तान काय करते ते महत्वाचे आहे.


