Jalna News : जालना जिल्हा एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे हादरला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या अनुदानातून तब्बल 25 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी 31 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात थेट महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांची अफरातफर करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 22 तलाठी, 5 तहसील कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी तसेच संगणक ऑपरेटर आणि नेटवर्क इंजिनिअर यांचा समावेश असलेल्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
बनावट शेतकरी, बनावट नोंदी अन् सरकारी लॉगिनचा गैरवापर
अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. मात्र गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्याऐवजी, काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने कट रचत ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही अशा व्यक्तींना लाभार्थी दाखवले.
धक्कादायक बाब म्हणजे तहसीलदारांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरून सरकारी प्रणालीत फेरफार करण्यात आला. घोटाळा उघड होऊ नये म्हणून कागदोपत्री तसेच डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी भूमिगत झाले, मोबाईल बंद केले आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सर्व आरोपींचा शोध घेत 31 जणांना अटक केली.
न्यायालयाकडून दणका; जामीन अर्ज फेटाळले
आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र तपासातील ठोस पुरावे आणि घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता सर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले.
मालमत्ता जप्तीची कारवाई, 4 आरोपी फरार
या प्रकरणात आतापर्यंत 35 जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून 4 आरोपी अद्याप फरार आहेत. घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी आरोपींची बँक खाती सील, काहींच्या मालमत्तांवर बोजा, तसेच मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
“या घोटाळ्यात सहभागी कोणालाही सोडले जाणार नाही. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली आहे.


