सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात एका ढाब्यावर थेट ईव्हीएम मशीन आढळल्याने निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी केला असून, त्यांनी निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
ढाब्यासारख्या खाजगी ठिकाणी ईव्हीएम मशीन आढळल्याची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, या घटनेवर स्पष्टीकरण देताना तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितले की, सदर ईव्हीएम मशीन राखीव (Reserve) स्वरूपातील असून त्याचा कोणत्याही मतदान प्रक्रियेशी संबंध नाही. कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
तथापि, निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशीन खाजगी ठिकाणी सापडणे हे गंभीर असून, त्यामुळे संशयाचे वातावरण कायम आहे. ही निवडणूक प्रक्रियेतली निष्काळजीपणा आहे की जाणीवपूर्वक घडवलेला प्रकार, याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


