बारामती : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्यात सरासरी सुमारे ७० टक्के मतदान झाले. मात्र, पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा लक्षणीयरीत्या कमी राहिला आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान बारामती तालुक्यात झाले असून येथे केवळ ५४.९० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीकरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यावर शोककळा पसरली होती. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीवर या घटनेचे सावट असल्याचे चित्र मतदानाच्या टक्केवारीतून स्पष्टपणे दिसून आले.
मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबीयांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. मात्र, सामान्य मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून आला नाही. परिणामी बारामतीत मतदानाचा टक्का पुणे जिल्ह्यात सर्वात कमी राहिला.
पुणे जिल्ह्यातील मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी
जुन्नर : ६१.१८ टक्के
आंबेगाव : ६५.३० टक्के
शिरूर : ७५.६९ टक्के
खेड : ७५.४६ टक्के
मावळ : ७७.४३ टक्के
मुळशी : ६३.७९ टक्के
हवेली : ६८.०२ टक्के
दौंड : ६५.०० टक्के
पुरंदर : ६८.३७ टक्के
वेल्हे : ७९.३० टक्के (सर्वाधिक)
भोर : ७५.६२ टक्के
बारामती : ५४.९० टक्के (सर्वात कमी)
इंदापूर : ६५.६७ टक्के
सुनेत्रा पवारांकडून मतदारांचे आभार
जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले असून, “अजितदादांचे विचार आणि कार्य अधिक सक्षमपणे पुढे नेले जाईल” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


