इंग्लंड संघाने कर्णधार हॅरी ब्रूकच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानचा पराभव करुन टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडने २०१६ ते २०२६ या कालावधीत सलग पाचव्यांदा उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली आहे. सध्या क्रिकेट विश्वात इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघाच्या क्षमतेवर कायम शंका घेतली जात आहे. त्यांची कामगिरी देखिल तशीच आहे. दोन्ही संघांना गेल्या काही वर्षात आपला ठसा उमटवता आलेला नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडने अलिकडे श्रीलंकेविरुद्ध राखलेले वर्चस्व हा त्याला अपवाद आहे. दुसरीकडे पाकिस्तानशी अजूनही कुठला मोठा संघ तेवढा सातत्याने खेळत नाही. त्यामुळे त्यांना आपला ठसा उमटविण्याची तशी संधीच मिळत नाही. आयसीसीच्या स्पर्धा असे एकमेव व्यासपीठ आहे की जेथे पाकिस्तानला सर्व संघांशी खेळायला मिळते.
पाकिस्तानला मात्र ही संधी देखिल साधता येत नाही. भारताविरुद्ध खेळण्याचे दडपण आणि त्यानंतर सातत्याने होणारे पराभव यामुळे त्यांचे आव्हान कठिण होते. दडपणाखाली ते खेळू शकत नाहीत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर पाकिस्तानला म्हणावे तशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. पण, जी धावसंख्या उभारली त्याचा बचाव करणे त्यांना शक्य होते. पाकिस्तानकडे फिरकी गोलंदाजांचे मुख्य अस्त्र होते. इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजी तेवढी प्रभावीपणे खेळता येत नाही हे वेगळे सांगायची गरज नाही. इंग्लंडकडे तसे नाव घेण्यासारखे फलंदाज राहिलेले नाहीत. जोस बटलर आणि हॅरी ब्रूक हे दोनच फलंदाज सध्या इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये डोळ्यासमोर येतात. पण, बटलर या स्पर्धेत अजिबात खेळताना दिसला नाही. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना शाहिन शाह आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीने खरे तर पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांचे काम सोपे केले होते. पहिल्या पाट षटकात आफ्रिदीने फिल साल्ट, जोस बटलर, जेकब बेथल असे इंग्लंडचे खंदे फलंदाज परत पाठवले होते.
अशा परिस्थितीत पाकिस्तानी फिरकी गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांवरील दडपण वाढवायचे होते. उस्मान तारीकने टॉम बॅन्टन आणि सॅम करन यांना बाद करुन तशी सुरुवात देखिल केली होती. पण, दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूक उभा असल्याचे पाकिस्तानी गोलंदाज विसरुन गेले. स्कूप, रिव्हर्स स्विप, स्विच हिट असे पुस्तकाबाहेरील फटके खेळण्याची ब्रूकची ख्याती. यामुळे अनेकदा तो टिकेचाही धनी झाला होता. या वेळी मात्र दुसऱ्या क्रमांकावर बढती घेतलेल्या ब्रूकने हे सगळे फटके ड्रेसिंगरुममध्ये ठेवले आणि कमालीच्या संयमाने धावफलक हलता ठेवत इंग्लंडचे आव्हान राखले. खराब चेंडूंचा समाचार घेत त्याने आक्रमकता देखिल दाखवली. सुरेख शतकी खेळी साजरी करत त्याने एकाहाती इंग्लंडचा विजय जवळपास साकार केला. पण, परिस्थितीनुसार खेळणे किती महत्वाचे असते हे दिसून आले. विजयासाठी मात्र दहा धावा आवश्यक असताना इंग्लंडने सहा धावांत तीन फलंदाज गमावले आणि हातातोंडाशी आलेला घास खायचेच विसरुन गेले असे वाटू लागले. विजयाचा घास त्यांना केवळ खायचा होता. त्यासाठी उघडलेले तोंड तसेच उघडे राहिले आणि घास असलेला हात खाली यायची भिती वाटू लागली. जोफ्रा आर्चरने पुन्हा तो हात उचलला आणि अखेर विजयाचा घास त्यांनी एकदाचा खाल्ला.
दुसरीकडे विजय आवश्यक असलेल्या सामन्यासाठी संघाचे नियोजन कसे असावे याचा विचार करण्यापेक्षा भारतीय संघ व्यवस्थापन खेळपट्टी कशा ठेवायचा याचाच खल करत बसले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईला चेपॉक मैदानाची खेळपट्टी फलंदाजी धार्जिणी राहणार हे सांगायची आता गरज नाही. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे गोलंदाजीचा उडवलेला धुव्वा पाहून तर वेगळे काहीच अपेक्षित नाही. पण, तरी चेपॉकवर तीन खेळपट्टी तयार असल्याचे समजते. यातील एक लाल, तर दोन काळ्या मातीच्या खेळपट्टी आहेत. काळ्या मातीच्या एका खेळपट्टीवर अजिबात गवत नाही, तर दुसरीवर गवत ठेवण्यात आले आहे. लाल मातीची खेळपट्टी तशीच आहे. पण, सोमवारच्या सराव सत्रात खेळाडू, प्रशिक्षकांच्या उपस्थितीनंतर खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीची संमिश्र राहणार असे ठरवण्यात आल्याचे बोलले जात आहे. अरे पण हे सगळे कशासाठी. तुमच्याकडे खेळाडू नाहीत का ? त्यांच्या क्षमतेवर तुमचा विश्वास नाही का ? या दोन्हीची उत्तरे हो आहेत, तर मग खेळपट्टीची चर्चा कशासाठी. असेल त्या खेळपट्टीवर खेळायला काय हरकत आहे. असा ही सामना झिम्बाब्वेशी आहे. आणि गळ्याशी आले की क्षमतेच्या पलिकडे जाऊन खेळायची आणि जिंकण्याचा आपला इतिहास आहे. या वेळी देखिल असेच काहिसे होणार असेच बोलले जात आहे. पण, गडयानो म्हणावे तेवढे हे सोपे नाही. कारण, आपल्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना आहे. हाच सामना भारताचा पुढचा मार्ग सुकर करु शकतो. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला, तर आपल्या उर्वरित दोन्ही विजयांना महत्व आहे. दक्षिण आफ्रिका हा सामना हरल्यास आपल्याला परवडणारे नाही. आपण निव्वळ धावगतीत उणे आहोत आणि दक्षिण आफ्रिका अधिक. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने त्यांचे तीनही सामने जिंकणे भारतासाठी महत्वाचे आहे.


