मुंबई : मंत्रालय येथील लाचखोरी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी मैदानात उतरले आहेत. झिरवळ निर्दोष असल्याचा दावा करत, त्यांना बदनाम करण्यासाठी “सुपारी” देण्यात आल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला आहे.
मंत्रालयातील झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला निलंबित औषध दुकानाचा परवाना पुन्हा देण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर या खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर झिरवळ यांच्या मंत्रिपदावरही चर्चा सुरू झाली आहे.
मात्र मिटकरी यांनी आरोप फेटाळत म्हटलं की, झिरवळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून आदिवासी समाजाचा आवाज आहेत. “त्यांना बदनाम करण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, ते लवकरच समोर आणू,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच तक्रारीच्या दिवशी राज्य शोकसागरात असताना संबंधित दावे केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणावर राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रालयात भ्रष्टाचार सर्रास होत असून मंत्र्यांना त्याची माहिती नसणे शक्य नाही, असा दावा त्यांनी केला. औषध दुकानांचे परवाने देताना पैशांची देवाणघेवाण होत असल्याचे आरोप करत त्यांनी सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा, अशी मागणी केली आहे.
संघटनेकडे राज्यभरातून लाचखोरीच्या तक्रारी येत असल्याचं सांगत, कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रालयातील लाचप्रकरण आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय वादाचा केंद्रबिंदू बनलं आहे.


