मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या अॅक्शन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम निर्माण केले आहेत. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, हा चित्रपट जगभरात नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. आता या चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. भारताशेजारील देश पाकिस्तानमध्ये या चित्रपटाला अधिकृतपणे बंदी आहे. असे असूनही, तो अजूनही ब्लॅक मार्केटमध्ये आहे.
‘धुरंधर’ची क्रेझ असो वा भारतीय चित्रपटांची उत्सुकता कराचीसारख्या शहरात लोक पायरसीद्वारे चित्रपट अतिशय कमी किमतीत खरेदी करत आहेत आणि पाहत आहेत. यासंबंधीचा एक व्हिडिओ न्यूझीलंडमधील युट्यूबर आणि ब्लॉगर कार्ल रॉक यांनी शेअर केला आहे, जो त्यांच्या ट्रॅव्हल व्लॉग्स आणि ‘हाऊ टू ट्रॅव्हल इन इंडिया’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर कार्ल रॉक यांनी एका व्लॉगमध्ये पाकिस्तानच्या भूमिगत पायरसी नेटवर्कचा पर्दाफाश केला. कार्लने कराचीच्या सदर बाजारातील रेनबो सेंटरला भेट दिली, जे पाकिस्तानमध्ये पायरेटेड चित्रपट आणि गेमिंगचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. तिथे कार्लला डेस्कटॉपवर धुरंधरचे पोस्टर लावलेले दिसले.
जेव्हा कार्लने चित्रपटाची किंमत विचारली. दुकानदाराने यूएसबी ड्राईव्हवर खरेदी केला तर त्याची किंमत ५० पाकिस्तानी रुपये (भारतात सुमारे १६ रुपये) आहे, तर डीव्हीडीवर त्याची किंमत सुमारे ३०० रुपये आहे. इतक्या कमी किमतीने कार्ल थक्क झाला.


