Janhavi Killekar : ‘बिग बॉस मराठी 5’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरली तिची आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम छोटा पुढारी यांच्यात सोशल मीडियावर झालेली शाब्दिक चकमक. जेजुरी येथे खंडेरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवीच्या व्हिडीओवर छोटा पुढारीने केलेल्या एका कमेंटमुळे हा वाद उफाळून आला.
जान्हवी किल्लेकर नुकतीच अभिनेता ओम यादव आणि कुटुंबीयांसोबत जेजुरी येथे दर्शनासाठी गेली होती. या भेटीदरम्यान दोघांनी खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होत भंडारा उधळला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जान्हवी आणि ओम यांच्या नात्याबाबत विविध चर्चांना उधाण आले.
नेटकऱ्यांच्या वाढत्या चर्चेनंतर ओम यादवने स्वतः पुढे येत स्पष्टीकरण दिले. “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर एकत्र प्रवास करतो आणि विविध देवस्थानांना भेट देतो. आमच्यात केवळ मैत्रीचे नाते आहे,” असे त्याने स्पष्ट केले.
मात्र याच व्हिडीओवर छोटा पुढारीने मिश्कील अंदाजात कमेंट करत, “ओम दादा, आता आम्हालाही एक वहिनी पाहिजे,” असे म्हटले. त्यावर ओमने हलक्याफुलक्या शैलीत उत्तर दिले. पण जान्हवीला ही कमेंट अजिबात पसंत पडली नाही.
छोटा पुढारीच्या कमेंटला उत्तर देताना जान्हवीने थेट संताप व्यक्त केला. “जास्त शहाणपणा करू नकोस. लोकांचं ठीक आहे, पण तुला अक्कल नाही का?” अशी तीव्र प्रतिक्रिया तिने कमेंट बॉक्समध्येच दिली. तिच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर नव्या चर्चांना सुरुवात झाली असून अनेक नेटकऱ्यांनी छोटा पुढारीलाही ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे.


