Maharashtra Politics : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भंडारा येथील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत राज्यसभेच्या उमेदवारीवरील सस्पेन्स संपवला.
मुंबईत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीत राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी अनेक नावांवर चर्चा झाली. छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्याची माहिती समोर आली. याशिवाय छगन भुजबळ, अमरसिंह पंडित आणि राजेंद्र जैन यांच्या नावांचाही गंभीरपणे विचार करण्यात आला.
मात्र दीर्घ चर्चेनंतर पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. तसेच भुजबळ कुटुंबाच्या राजकीय भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर पक्ष नेतृत्वाने राजेंद्र जैन यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद न साधत बैठकीतून बाहेर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


