Pune Crime News : पुण्यात पोलिसांची वर्दी घालून स्वतःला पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून सादर करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तिने हा बनाव रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी पुण्यातील कॅम्प परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिना हिचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने ती सध्या एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. दरम्यान, उपचारासाठी एका नामांकित क्लिनिकमध्ये डॉक्टरांची भेट मिळत नसल्याने तिने थेट पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला.
६ जून रोजी लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे कॅम्प परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक महिला पोलिसांच्या वर्दीत क्लिनिकबाहेर उभी असल्याचे दिसले. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी चौकशी सुरू केली.
महिला कर्मचारीच्या मदतीने संबंधित तरुणीकडे तिची नियुक्ती, पोलीस ठाण्याचे नाव, ओळखपत्र आणि सेवेशी संबंधित माहिती विचारण्यात आली. मात्र समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशीत ती प्रत्यक्षात पोलीस कर्मचारी नसल्याचे उघड झाले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांचा गणवेश घालून क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकत लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा तिचा प्रयत्न होता. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


