Weather Update : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी त्याची पुढील वाटचाल सध्या मंदावल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनची प्रगती ठप्प झाली असून तो अद्याप अरबी समुद्रातून पुढे सरकलेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १५ जूननंतर मान्सून राज्याच्या उर्वरित भागात अधिक वेगाने विस्तारू शकतो.
मान्सूनचा प्रवास रखडला असला तरी राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रविवारी सिंधुदुर्गातील दोडामार्ग, कणकवली तसेच रत्नागिरीतील राजापूर भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही जोरदार सरींनी हजेरी लावली. आजही अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर, सांगली, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाट आणि दमट हवामानाचा इशारा कायम असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरणासोबत उन्हाचाही चटका कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा अजूनही ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. अकोला येथे ४३.३ अंश, ब्रह्मपुरी ४३.२ अंश, वर्धा ४३ अंश, चंद्रपूर ४२.४ अंश, मालेगाव ४२ अंश आणि गडचिरोली ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.


