Accident News : समृद्धी महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात खासगी प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याहून नागपूरकडे निघालेली ‘बाबा ट्रॅव्हल्स’ची लक्झरी बस समोरील ट्रकवर पाठीमागून जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आणि अनेक प्रवासी वाहनातच अडकून पडले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या ११ जणांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय वैद्यकीय केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत करत अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरही रविवारी सायंकाळी आणखी एक गंभीर अपघात घडला. बिडकीनजवळ भरधाव कारने आधी एका वाहनाला धडक दिली, त्यानंतर डिव्हायडरवर आदळून पुढील ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


