मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचं नेतृत्व नेमकं कोणाकडे जाणार यावर राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतही विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले होते. आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतही त्यांच्या नावाचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार सध्या पुणे दौऱ्यावर असून सर्किट हाऊसमध्ये त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांच्या भेटी घेत आहेत. या भेटीसाठी पक्षातील काही महत्त्वाचे पदाधिकारी, तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांचीही उपस्थिती दिसून आली आहे. त्यामुळे या बैठकींना राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड पुढील १५ दिवसांत होण्याची शक्यता आहे. आमदार-खासदारांमधून सुनेत्रा पवार यांच्या नावाला पाठिंबा वाढत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती समोर येत आहे.


