Vidhan Parishad Election: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. महाविकास आघाडीच्या (मविआ) काही उमेदवारांनी संख्याबळ आणि अंतर्गत सहकार्य लाभत नसल्याचे सांगत माघार घेतली, तर दुसरीकडे बंडखोरांना शांत करण्यात महायुतीच्या नेत्यांना मोठे यश आले. या सर्व घडामोडींनंतर ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १२ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने ठाकणार आहेत. बिनविरोध झालेल्या जागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन, तर भाजपने एका जागेवर बाजी मारली आहे.
५ जागांवर बिनविरोध विजयी झालेले उमेदवार:
१. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जात अर्ज मागे घेतला, ज्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत संजय राऊत यांनी माने यांची पक्षातून हकालपट्टी केली. शेकापच्या अरविंद म्हात्रे यांनीही येथून माघार घेतली.
२. पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले आहेत. येथे राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर प्रदीप कंद आणि शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले.
३. ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात उभे असलेले शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी माघार घेतली.
४. यवतमाळ: या मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले आहेत. काँग्रेसचे साहेबराव कांबळे आणि मविआचे समर्थन मिळवू पाहणारे सय्यद फारुख यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने चतुर्वेदींचा मार्ग मोकळा झाला.
५. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: भाजपचे उमेदवार अरुण लखानी यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. येथील काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष सुधीर कोठारी यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
‘या’ १२ जागांवर होणार चुरशीची लढत:
नाशिक (दराडे विरुद्ध गीते): हा मतदारसंघ अत्यंत चर्चेत राहिला. शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपच्या गोकुळ गीते यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने येथे दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होईल. भाजपच्या गणेश गीते यांनी मात्र अर्ज मागे घेतला.
नागपूर: काँग्रेसचे मुख्य उमेदवार अतुल लोंढे यांच्या विरोधात महायुतीचे डॉ. राजीव पोतदार उभे ठाकणार आहेत. काँग्रेसचे दुसरे उमेदवार दिनेश ढोले आणि शेकापचे सुरेंद्र लोही यांनी माघार घेतली आहे.
सांगली-सातारा: येथे धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप यांच्यात थेट मुकाबला होईल. शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनी शंभराज देसाई यांच्या उपस्थितीत अर्ज मागे घेतला.
अहिल्यानगर: काँग्रेसचे करण ससाने यांनी माघार घेतली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष दत्तात्रय पानसरे यांचा अर्ज शिल्लक असून, त्यांच्या माघारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
सोलापूर: भाजपचे राजेंद्र राऊत आणि शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांच्यात मुख्य लढत होणार आहे. आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांनी येथून माघार घेतली आहे.
नांदेड: काँग्रेसचे रामदास पाटील यांच्या विरोधात भाजप महायुतीचे अमर राजूरकर मैदानात आहेत. येथे राष्ट्रवादीच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुत्राने (प्रवीण पाटील चिखलीकर) माघार घेतल्याने महायुतीचे बंड शमले.
भंडारा-गोंदिया: काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड आणि बंडखोर प्रफुल अग्रवाल यांनी माघार घेतली असली, तरी अजित पवार गटाचे भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांची उमेदवारी कायम आहे.
अमरावती: येथे भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
परभणी-हिंगोली: शिंदे गटाचे सईद खान आणि ठाकरे गटाचे डॉ. विवेक नावंदर यांच्यात मुख्य लढत अपेक्षित आहे. काँग्रेसचे सुशील देशमुख यांचाही अपक्ष अर्ज येथे कायम राहिला आहे.


