Vidhan Parishad Election : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप निश्चित झाल्यानंतर शिवसेनेने आपल्या वाट्याला आलेल्या चार जागांसाठी उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली आहेत. अंतिम सूत्रानुसार महायुतीत भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ हे मतदारसंघ आले आहेत. ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक, नाशिकमधून नरेंद्र दराडे आणि परभणी-हिंगोलीमधून सईद खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यवतमाळ मतदारसंघासाठी अद्याप अंतिम नाव जाहीर झाले नसले तरी दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव, सलीम खातून यांची नावे चर्चेत आहेत. या तिघांपैकी एका उमेदवारावर पक्ष अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परभणी-हिंगोली मतदारसंघातून सईद खान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय विशेष चर्चेत आला आहे. शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सईद खान हे श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समतोल साधण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे परभणी-हिंगोलीच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


